भारत करणार 55 देशांना ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ चा पुरवठा
जगभरातील 200 हून अधिक देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. सर्वच देश आपापल्या पद्धतीने कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आशा परिस्थितीत भारताने इतर देशांनाही मदतीचा हात दिला आहे. भारताने अमेरिकेसह 55 देशांना कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ औषधाचा पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे.
कोरोनावर अद्याप जगभरात ठोस औषधे उपलब्ध नाहीत. मलेरियावरील हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोनावर परिणामकारक ठरत असल्याने या औषधाला भारतातून मागणी वाढत आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जगात या औषधाच्या उत्पादनात भारताचा 70 टक्के वाटा आहे. सुरुवातीला औषधांचा पुरेसा साठा नसल्याने भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता ही निर्यात बंदी भारताने उठवली आहे.
भारत 55 देशांना ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करणार आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, इंग्लंड, फ्रान्स, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान यासह अन्य देशांचा समावेश आहे.