कोरोना संकटात RBI चे ५० हजार कोटीचे पॅकेज जाहीर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज विविध उपाय योजना आणि पॅकेजची घोषणा केली आहे. त्यानुसार रेपो कपात तसेच नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे हा दर 4 टक्क्यांवरून 3. 75 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आता सर्वच प्रकारच्या कर्जावरील व्याजदर कमी होईल.
आरबीआयकडून नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबी ला 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यातील 25 हजार कोटी नाबार्डला, सीआयडीबीआय ला 15 हजार कोटी आणि एनएचबी ला 10 हजार कोटी मिळणार आहेत. असे दास यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, एलसीआर 100 टक्क्यांवरून कमी करत 80 टक्क्यांवर आला आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे मोठी मंदी निर्माण होण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे.
कोरोना संकटामुळे भारताचा विकासदर 1.9 राहील असा अंदाज ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हे संकट संपल्यावर हा दर 7.2 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. इतकेच नाही तर कोरोनामुळे जगभरात 9 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होईल अशी भीती दास यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे निर्यात घटली आहे. विजेची मागणी, ऑटोमोबाईल क्षेत्रातील विक्री यामध्येदेखील घट झाली आहे. मात्र, इंटरनेट बँकिंगमुळे चांगले काम चालू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.