छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
जन्म : पुरंदर किल्ला, १४ मे १६५७
मृत्यू : तुळापूर, महाराष्ट्र, ११ मार्च १६८९
हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
*मराठा साम्राज्य*
*अधिकारकाळ* -जानेवारी १६, इ.स. १६८१ – मार्च ११, इ.स. १६८९
*राज्याभिषेक* - जानेवारी १६, इ.स. १६८१
*राज्यव्याप्ती* -पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून ते दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
*राजधानी* -रायगड
*पूर्ण नाव*-संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
*जन्म*-१४ मे, इ.स. १६५७ पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
*मृत्यू*-११ मार्च, इ.स. १६८९तुळापूर , महाराष्ट्र (समाधी: वढू, महाराष्ट्र)
*पूर्वाधिकारी*- शिवाजी महाराज
*उत्तराधिकारी*- राजाराम महाराज
*वडील*-शिवाजी महाराज
*आई*-सईबाई
*पत्नी*-येसूबाई
*संतती*-शाहू, भवानीबाई
*राजघराणे*-भोसले
*राजब्रीदवाक्य*-श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा धौरीव राजते, यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी
*चलन* होन व शिवराई
*बालपण*
संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचेनिधन राजे लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
*तारुण्य*
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात मातोश्रींचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.
तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.
*मुद्रा व दानपत्र*
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
अर्थ: शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालवते.
संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत. त्या ओळी खालीलप्रमाणे :
|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज || || छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||
यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति ' म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.
*छत्रपति संभाजी महाराजांचे धार्मिक धोरण*
दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, '...राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...'. युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.
*संतजनांस राजाश्रय:*
१. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)
२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजन्त्रीची कायमची व्यवस्था लाऊन दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर
५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च
वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी '...धर्मकार्यात खलेल न करणे..' अशा शब्दात ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून '...धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही...' असे अभिवचन दिले आहे.
सक्तीने धर्मांतरास विरोध:
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेन्री ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे;
*अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख:*
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरु झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफी संबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.
'...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...'
*प्रधान मंडळ*
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले)
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
सरसेनापती - हंबीरराव मोहिते
छांदोगामात्य - कवी कलश
पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
चिटणीस - बाळाजी आवजी
सुरनीस - आबाजी सोनदेव
डबीर - जनार्दनपंत
मुजुमदार - अण्णाजी दत्तो
वाकेनवीस - दत्ताजीपंत
*औरंगजेबाची दख्खन मोहीम*
औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजीच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.
*दगाफटका*
इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
*शारीरिक छळ व मृत्यु*
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना महाराष्ट्राने धर्मवीर ही पदवी बहाल केली.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. संभाजी राजेंचे डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जीभ कापणे यांसारख्या शिक्षा फर्मावल्या. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. .
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांचे डोळे काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जीभ कापण्याची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले, तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यांची जीभ तलवारीने कापली.
*साहित्यिक संभाजीराजे*
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे :
'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
याचबरोबर संभाजीराजांनी नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनयन हा ग्रंथ लिहून संभाजीराजांना अर्पण केला.