वटसावित्रीची आरती : वटसावित्रीची आरती मराठीत आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहे .
वटसावित्रीची आरती
अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ॥ अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें कां प्रणीला ॥ आणखी वर वरी बाळें । मनि निश्चय जो केला ॥ आरती वडराजा ॥ १ ॥
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ भावें करीन मी पूजा । आरती वडराजा ॥ धृ. ॥
ज्येष्ठमास त्रयोदशी । करिती पूजन वडाशी ॥ त्रिरात्र व्रत करुनियां ॥ जिंकी तूं सत्यवंताशी ॥ आरती वडराजा ॥ २ ॥
स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ॥ धर्मराज उचकला । हत्या घालील जीवाला ॥ येई गे पतीव्रते पती नेई गे आपुला । आरती वडराजा ॥ ३ ॥
जाऊनिया यमापाशीं । मागतसे आपल्या पती ॥ चारी वर देऊनिया । दयावंत द्यावा पती । आरती वडराजा ॥ ४ ॥
पतिव्रते तुझी कीर्ती ऎकूनि ज्या नारी ॥ तुझी व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ॥ आरती वडराजा ॥ ५ ॥
पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ॥ स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया । आणिलासी आपला पती । अभय देऊनिया । पतिव्रते तारी त्यासी ॥ आरती वडराजा. ॥ ६ ॥
वटसावित्रीची कथा
पौराणिक कथेनुसार, भद्र नावाच्या राज्यात अश्र्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यानंतर अश्वपती राजाने तिला स्वत:चा पती निवडण्यास सांगितले. त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. शाल्व नावाच्या राज्यात धृमत्सेन नावाचा अंध राजा राज्य करत होता. सत्यवान हा याच राजाचा पुत्र होता.
धृमत्सेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता. त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसह जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त एक वर्षांचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. पत्र सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी लग्न केले. लग्नानंतर ती जंगलात येऊन सत्यवान आणि सासू-सासऱ्यांसोबत राहून त्यांची सेवा करु लागली.
एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो. सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते. लाकडं तोडता तोडता सत्यवानला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो. यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात. पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते.
अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले. तिसरे वरदान म्हणून तिने मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने नादात तथास्तू म्हटलं. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.