गजानन महाराज प्रकट दिन
यावर्षी, रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन आहे.
गजानन महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही.
दिनांक 23 फेब्रुवारी 1878, रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले.
श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जातात.
महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार,दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होत असताना सातव्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो.
‘गण गण गणात बोते’ नामाचा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात प्रकट दिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात लाखो भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
गजानन महाराजांबद्दल माहिती
शेगावनिवासी श्री संत गजानन महाराजांना श्री दत्तगुरुंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखले जाते. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने ‘आंध्रा योगुलु’ नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे.
गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत.
भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते या मंत्राचा अखंड जप करत असत.
श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी, भक्तवत्सल होते. पालखी माध्यमातून गजानन महाराज अगदी खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचले.
मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार 8 सप्टेंबर 1910 ला समाधी घेऊन संपवला. मात्र त्याआधी दोन वर्षांपूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती. दरम्यान, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेतली. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहचल्यावर त्यांचे प्राण अनंतात विलन झाले.